डोंबिवली- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आहे. मात्र प्रभाग क्रमांक 32 चे नाव गणेश मंदिर जयहिंद कॉलनी असताना या प्रभागातील गणेश मंदिर प्रभाग क्रमांक 29 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मंदिरच वगळल्याने आमच्या प्रभागाचे नाव गणेश मंदिर का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत प्रभाग क्रमांक 32 मधून वगळण्यात आलेले 1940 मतदार प्रभाग क्रमांक 29 मध्ये समाविष्ट केले आहे. हे मतदार पुन्हा प्रभाग क्रमांक 32 मध्ये समाविष्ट करण्या यावेत अन्यथा उपोषण करण्याचा इशारा भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी माजी नगरसेवक धात्रक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन एव्हरेस्ट हॉलमध्ये केले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त इशारा प्रशासनाला दिला आहे. माजी नगरसेवक धात्रक यांनी सांगितले की, महापालिकेने प्रभाग रचना जाहिर केली. त्यावेळी प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात 14 फेब्रुवारी रोजी हरकत घेण्यात आली होती. प्रभाग रचना प्रसिद्ध केली. त्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 32 हा गणेश मंदिर जयहिंद कॉलनी होती. त्यात गणेश मंदिराचा समावेश असल्याने त्या प्रभागाचे नाव गणेश मंदिर होते. मात्र महापालिकेने निवडणूकीचा मतदार यादी प्रसिद्ध केली. प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी पाहून धात्रक यांना धक्काच बसला.
32 नंबरच्या प्रभागातून गणेश मंदिरच वगळण्यात आले आहे. मंदीर वगळल्याने प्रभागाचे नाव गणेश मंदिर का, असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केला आहे. तसेच 32 नंबरच्या प्रभागातून 1940 मतदार हे प्रभाग क्रमांक 29 मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यावर जोरदार हरकत घेत धात्रक यांनी महापालिकेचे अधिकारी विनय कुळकर्णी यांची भेट घेतली. तसेच यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या मागणीनुसार प्रभागात गणेश मंदीराचा समावेश आणि वगळण्यात आलेले 1940 मतदार पुन्हा समाविष्ट केले गेले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा धात्रक यांनी दिला आहे.