अनिकेत घमंडी/ डोंबिवली : येथील टिळक चौक मधील स्टेट बँक समोर असलेला केडीएमटी बस सेवेचा बस स्टॉपची दुर्दशा झाली असून त्यावरील जाहिरात कंपनीचा फलक तुटून आणि सडून खाली आला आहे. सदर रस्ता हा वर्दळीचा असल्याने लहान, मोठी वाहने या रस्त्यावरून सतत येत जात असतात. त्यामुळे हा फलक केव्हाही पडल्यास किंवा वाहनाच्या धक्का त्याला लागल्यास त्यातील गंजलेल्या पत्र्यामुळे एखादी दुर्घटना होऊ शकते.
कल्याण, एमआयडीसी निवासी इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी हा बस स्टॉप असून यात प्रवाशांना बसण्यासाठी बाकडी नसल्याने तसेच छप्पर तुटल्याने धड प्रवासी उभे राहू शकत नाही किंवा धड बसू शकत नाही अशी अवस्था झाली आहे. बस साठी वाट पाहणारे प्रवासी रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहत असतात, तेव्हा एखाद्या वाहनांचा धक्का त्यांना लागू शकतो. एमआयडीसी निवासी हा केडीएमटीचा सर्वात फायदेशीर बस मार्ग असताना केडीएमसी/केडीएमटी प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची टीका पादचारी करत आहेत.
यापूर्वी नवीनच बांधलेल्या पेंढरकर कॉलेज बस स्टॉपची झालेली दुर्दशा त्यांच्या निर्दशनास आणूनही त्यावर काहीच कार्यवाही त्यांच्याकडून अद्याप झाली नाही आहे. विशेष म्हणजे कोणीही लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी याबद्दल काहीच बोलत नाहीत. : राजू नलावडे, दक्ष नागरिक, डोंबिवली