डोंबिवली: ठाकुर्लीतील म्हसोबानगर झोपडपट्टी रेल्वे पटरी मार्गाला लागून असलेल्या गल्लीतून समांतर रस्ता आणि ९० फिट रस्त्याच्या दिशेने ये-जा करणा-या प्रवाशांना लुटण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला प्राणघातक शस्त्रांसह रामनगर पोलिसांनी रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास अटक केली. आरोपींमध्ये दोनजण अल्पवयीन आहेत. या गुन्हयात तीन रिक्षाचालकांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.
सागर उर्फ मुन्ना शंभु शर्मा (वय १९), जेम्स गांधी सुसे (वय २४), सत्यकुमार मुकेश कनोजिया (वय १९), सचिन ऊर्फपिल्लु उमाशंकर राजभर (वय २१), सोनु मदन कनोजिया (वय १९), या पाच जणांसह टोळीत दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सागर, जेम्स, सत्यकुमार हे तिघे रिक्षाचालक आहेत. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरून वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, शंकर निवळे, सोमनाथ पिचड, वैजनाथ रावखंडे, नितीन सांगळे, शिवाजी राठोड, दिलीप कोती, सुनील भणगे यांच्या पथकाने म्हसोबा चौकात सापळा लावून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रु डायव्हर अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि एक नायलॉन दोरी आढळून आली.
हे सर्वजण ठाकुर्ली चोळेगाव, म्हसोबानगर, डोंबिवली खंबाळपाडा, शेलारनाका त्रिमुर्तीनगर झोपडपट्टीमधील राहणारे आहेत. त्यांच्याकडून रामनगर, टिळकनगर, मानपाडा, हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिक्षा, दुचाकी, मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात तपास पथकाला यश आले. अटक आरोपींकडून रिक्षा, दोन दुचाकी, दोन मोबाईल असा १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. २०१८ पासून चोरीच्या गुन्हयात सक्रिय आहेत. ते मुळचे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि हरियाणाचे रहिवासी आहेत. अंधाराचा फायदा उठवित धारदार शस्त्राचा धाक दाखवित पादचा-यांना लुटणे अशी त्यांच्या गुन्हयाची पध्दत होती. आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी कल्याण न्यायालयाने सुनावल्याचे कुराडे यांनी सांगितले.