मयुरी चव्हाण
डोंबिवली - गुलाबी रस्ता असो वा हिरवा पाऊस, डोंबिवली शहर हे कायमच प्रदूषणामुळं चर्चेत असतं. आता डोंबिवलीतील एक नाला चर्चेत आला आहे. हा नाला चक्क हिरव्या रंगाचा आहे. एमआयडीसी हा नाला चक्क गडद हिरव्या रंगाच्या पाण्यानं वाहतोय हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. परंतु हे भीषण वास्तव आहे. एमआयडीसी मधील गणेश नगर परिसरातील हाच नाला पुढे गांधीनगरला जाऊन मिळतो. केमिकलयुक्त पाणी थेट नाल्यात सोडण्याचा महाप्रताप केल्यानं गतवर्षी देखील हिरव्या नाल्याचं दर्शन नागरिकांना झालं होतं. त्यानंतर राज्य स्तरावर या घटनेची दखल घेतली गेली.
स्थानिक पातळीवर सर्व सूत्र हलली. मात्र तरीही प्रदुषणाचा प्रश्न कायम असून कंपन्यांची मुजोरी सुरूच असल्याचं दिसून येतंय. या नाल्याचं हे दृश्य सोमवारी दुपारी २ वाजताचं आहे. संबंधित यंत्रणा ना वारंवार तक्रार करूनही कोणताच उपयोग होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक उमेश भंडारे यांनी केला आहे. दरम्यान या परिसरातुन रात्री 12 वाजेपर्यंत कंपन्यांमधून मोठमोठ्याने आवाज येत असल्याचं देखील सांगितलं जातंय. याअगोदर सुद्धा प्रदुषणामुळे रस्त्या गुलाबी होणं आणि हिरवा पाऊस पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र दिवसाढवळ्या केमिकलचं पाणी नाल्यात सोडलं जात असल्यानं कंपन्यांना नेमकं कोणाचं अभय आहे? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. डोंबिवली शहर हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं आजोळ आहे. त्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्येची दखल ते गांभीर्यानं घेतात का ? ते पाहावं लागेल.