कल्याण-कल्याणमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या उद्धव सेनेचे पदाधिकारी बाळ हरदास यांना आज दुपारी बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बाळ हरदास हे ठाकरे उद्धव सेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांना अशी माहिती मिळाली होती की, कल्याणमधील पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी एक पत्र तयार केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जगाचे हिंदू ह्दय सम्राट कोण बाळासाहेब ठाकरे की नरेंद्र मोदी ? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे. एसबीआय लाल चौकी येथील शाखेत ज्येष्ठ नागरीकांना चेक बूक नाकारले जाते.
हीच मोदींची ग’रंटी आहे का असा सवाल ते मोदी यांना विचारणार होते. हे प्रश्न विचारण्यासाठी हरदास सभा स्थानी जाणार असल्याचे पत्र त्यांनी बाजारपेठ पोलिसांना दिले होते. ते आज दुपारी सभेच्या ठिकाणी जाण्याकरीता निघाले असता पोलिसांनी त्यांना त्यांच्या घराच्या बाहेरच ताब्यात घेऊन सभेला जाण्यापासून रोखले. मोदी यांची सभा संपल्यावर त्यांना सोडून देण्यात आले आहे.
गेल्याच आठवड्यात हरदास यांनी शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि नगरसेवक अरविंद पोटे यांना धमकी दिली होती. या प्रकरणी मानपाडा पाेलिस ठाण्यात हरदास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चाैकशीकरीता हरदास यांना पोलिसांनी नेटिस बजावली होती. ही नोटिस हरदास यांनी जुमानली नाही. त्या पाठाेपाठ आज पुन्हा ते मोदीच्या सभा स्थानी जायला निघाले होते.