अनिकेत घमंडी, डोंबिवली: श्री गणेशाची पालखी, ढोलताशा पथके, सायकल-बाईक रॅली, विविध चित्ररथ, प्रात्याक्षिके, पारंपारिक पोषाखातील लाखो डोंबिवलीकरांनी सजलेल्या गुढीपाडव्यनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेचे यंदाचे २६ वे वर्ष. शतकमहोत्सवी वर्ष सुरु असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थांनाच्या नेत्तृत्वाखाली हा सोहळा सुरु असून यंदा यात्रेसाठी सुप्रसिद्ध विधीतज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री गणेश मंदिर संस्थांनाच्या शतकमहोत्सवी वर्षाची ९ एप्रिल रोजी होणारी यंदाची यात्रा नाविन्यपूर्ण करण्याचा संस्थानाचा व सर्व डोंबिवलीकर संस्थांचा मानस आहे. यासाठी शहरातील संस्था प्रतिनिधींची सभा गणेश मंदिर येथे घेण्यात आली. यांत दरवर्षीपेक्षा पंधरा नवीन संस्थाचा समावेश होता.
यंदा रामराज्य व मानवी मुलभूत मुल्ये या संकल्पनेवर सर्व डोंबिवलीकर संस्थांनी विविध चित्ररथ तसेच वैविध्यपूर्ण स्वरूपाने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन यानिमित्ताने स्वागत यात्रा प्रमुख दत्ताराम मोंडे यांनी केले. यात्रेमध्ये मराठी सिने कलाकारांची मांदियाळी डोंबिवलीकरांना अनुभवायला मिळणार आहे. गणेश मंदिर येथे ४ दिवस आधी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची अनुभूती सर्वांना घेता येणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थानने अनेक समाज उपयोगी उपक्रम केले आहेत.
स्वागतयात्रेनिमित्त सर्व डोंबिवलीकर एकत्र येतात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात याच लोकशक्तीचा वापर करून समाज उपयोगी कार्यासाठी नवीन उपक्रम करण्याचा विषय या सभेनिमित्त प्रस्तुत आला. सभेस संस्थांचे सुमारे ११० सभासद उपस्थित होते. आता पुढील सभा शनिवार ३० मार्च रोजी वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान येथे घेण्यात येणार असल्याचे यानिमित्ताने सांगितले. पसायदानाने सभेची सांगता झाली.