लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील कॅम्प नं. ३, शांतीनगर परिसरात सोमवारी पहाटे ५ वाजता एका तर्राट (मद्यधुंद) कारचालकाने दोन रिक्षांसह काही वाहनांना धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी व चालक ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारचालक लवेश कमलेश केवळरामानी याला अटक केली आहे.
रिक्षातील सामुदीप सुकुमार जाणा (वय ३३), अंजली जाणा (वय ६१) व चालक संभु रामअवध चौहान अशी मृतांची नावे आहेत, तर रिक्षाचा चालक जावेद जफर सय्यद याच्यासह महेंद्र भारत पांढरे व प्रमोद दौड गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
मावशीसोबत आला होतो कोलकातावरून सोमुदीप जाणा हा मावशी अंजली जाणा हिला घेऊन सकाळी कोलकातावरून आला होता. कल्याण रेल्वे स्टेशनवरून तो मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षा धडक देताच काही कारला जोरदार धडक दिली आणि दोघांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला, तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कारमधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कारमधून साहित्य नेणाऱ्यालाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. कारचालक लवेश केवलरामानी याला पोलिसांनी अटक केली असून तोही या घटनेत जखमी झाला आहे.