अंबरनाथ: अंबरनाथचे प्रसिद्ध उद्योजक सुमेध भवार यांना जेवणात घातक पदार्थ टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि चुलत भावाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सुमेध भवार यांच्या जेवणात हळुवारपणे शरीरात बाधा निर्माण करणारे घातक पावडर टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, ही बाब त्यांच्या लक्षात येताच सुमेध भवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांची पत्नी संचिता भवार त्यांचा चुलत भाऊ राहुल भवार आणि त्याची पत्नी सुनीता तसेच त्यांची मोलकरीण सुनिता भक्तीयानी यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी कोणाला अटक केली नाही. दरम्यान यातील सर्व आरोपींनी कल्याण अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी सुमेध भवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता कोणत्याही क्षणी यातील आरोपींना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात आरोपी राहुल भवर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.