डोंबिवली : रेल्वेस्थानक परिसरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे; परंतु डोंबिवली स्थानकाबाहेरचा परिसर याला अपवाद ठरत आहे. केडीएमसीच्या कुचकामी ठरलेल्या फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांमुळे मनाई क्षेत्रात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून पदपथावर व्यवसाय थाटले जात आहेत. त्यामुळे तेथे सकाळ-सायंकाळी कोंडीचे चित्र पाहायला मिळत आहे.
फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. फेरीवाले आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये कारवाईवरून नेहमीच यापूर्वी संघर्षाचे प्रसंग घडले. आजही हे चित्र दिसून येते. कारवाई होत असताना ‘केवळ कारवाई नको, आमच्या हक्काची जागा द्या,’ अशी मागणी करून फेरीवाले व त्यांच्या संघटना राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत असत. परंतु, आता संघटनांना आणि केडीएमसीला या धोरणाचा विसर पडल्याचे, होत असलेल्या विलंबावरून स्पष्ट होत आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाचे वाढलेले रुग्ण व लॉकडाऊन पाहता, ही प्रक्रिया पूर्णपणे थंडावली. दरम्यान, अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. तेव्हा कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. आताही कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सध्या प्रशासनाकडून थातुरमातुर सुरू असलेली कारवाई आणि फेरीवाल्यांचे वाढते प्रस्थ पाहता, स्थानक परिसरातून वाट काढणे नागरिकांना कठीण होत आहे.
मनसेला विसर
कोरोना काळात सगळ्यांनाच आर्थिक फटका बसल्याने दिवाळीनंतर कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात यावेत, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना ऑक्टोबरमध्ये दिला होता; परंतु आमदारांनाही त्यांच्या इशाराचा विसर पडल्याचे फेरीवाल्यांच्या वाढलेल्या अतिक्रमणातून स्पष्ट होत आहे.