कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका हददीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम दोन ते तीन गटांमध्ये दिवसरात्र सुरु ठेवावे असे आदेश महापालिकेचे शहर अभियंता अर्जून अहिरे यांनी संबंधितांना दिले आहेत. महानगरपालिका हद्दीतील खड्ड्यांबाबत अहिरे यांनी नुकतीच प्रभाग क्षेत्र कार्यालयातील सर्व उपअभियंता आणि कंत्राटदार यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
रस्त्यावरील खड्डे प्रभावीपणे आणि परिणामकारक भरल्याचे दिसून येत नसल्याने याबाबत अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या मटेरीअलने खड्डे जास्त टिकतील त्याचा वापर करून तसेच खड्ड्याचा आकार बघून दुरूस्ती करावी, ज्या ठिकाणी खड्डे भरण्यात आलेले आहेत त्या ठिकाणची ल’ण्ड मार्क रजिस्टरमध्ये दिनांकासह नोंद ठेवण्यात यावी, सर्व अभियंता आणि कंत्राटदारांनी त्यांचे क्षेत्रात येत असलेल्या प्रत्येक रस्त्यावर एक जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी. त्या व्यक्तीने दररोज त्या रस्त्यावर फिरून खड्ड्यांची ठिकाणे बघावीत आणि खड्डे भरण्याची कार्यवाही त्याच दिवशी करावी.
दुस-या दिवशी त्या रस्त्यावर पुन्हा पाहणी करतांना भरलेले खड्डे टिकले आहेत की नाही याची तपासणी करावी. नविन पडलेले खड्डे भरण्याची कार्यवाही करून घ्यावी, आवश्यक त्या ठिकाणी जेसीबीने खड्ड्यांची लेव्हल करून रोलींग करावी. रस्त्यावर खड्डे भरण्याची कामे करण्या-या कामगारांना सुरक्षिततेची सर्व साधने उपलब्ध करून दयावीत, त्याचप्रमाणे सर्व कामगारांना केडीएमसीच्या नावाचे ज’केट रेनकोट घालणे बंधनकारक करावे. जास्तीत जास्त कामे रात्रीच्या वेळी करावीत. जेणेकरून कमी ट्रफिकमुळे कामे जास्त प्रमाणात होतील, अशाही सूचना अहिरे यांनी दिल्या आहेत.
महापालिकेव्यतिरिक्त इतर संस्थांच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरूस्तीबाबत संबंधित अभियंता यांना लेखी कळवावे आणि त्यांनी कार्यवाही न केल्यास महापालिकेचे नागरीक, प्रशासन यांचेप्रती सद्भावना ठेवून त्या रस्त्यावरील खड्डे महापालिकेच्या कंत्राटदारांनी भरून घ्यावेत. झालेल्या खर्चाची संबंधित संस्थेकडून मागणी करावी. याच रस्त्याचे संबंधित अभियंता, कंत्राटदाराचे नांव, मोबाईल क्रमांक, रस्त्यांची सुरूवात आणि शेवटचे ठिकाण याची माहिती नजिकच्या पोलीस स्टेशनमधे माहितीसाठी देण्यात यावी. सर्व कामे दर्जा राखून करावीत. आवश्यक त्या ठिकाणी आरएमसी आणि पा’लीमरी का’न्क्रीट वापरावे असे ही अहिरे यांनी सूचित केले आहे.