डोंबिवलीः एका टोलेजंग इमारतीमधील बाराव्या मजल्यावरून नैराश्येतून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या 27 वर्षीय युवकाचे केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले. ही घटना आज रात्री आठ वाजता पूर्वेकडील लोढा संकुल परिसरात घडली. जवानांच्या कार्यतत्परतेचे, त्यांनी दाखविलेले धाडस आणि प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोढा संकुलातील ऑर्किड एल इमारतीतील एक युवक बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. या घटनेची माहिती केडीएमसीच्या पलावा मधील अग्निशमन केंद्राला मिळताच जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. १२ व्या मजल्यावरील अर्धा ओपन असणाऱ्या भितीवरून खाली उतरत सज्याच्या भिंतीवर तो युवक बसलेला होता. अग्निशमन दलाचे जवान त्याला न दिसता त्या परिसरात पोहचले. त्यांनी बाराव्या माळ्यावरील सज्याच्या अर्ध्या ओपन भिंतीकडून दोरीचा फास त्याच्यावर टाकून त्याला अलगद वर उचलून त्याची सुरक्षित सुटका केली आणि संभाव्य दुर्घटना टळली.
यावेळी उपस्थितांनी सुटेकचा निश्वास सोडला. घटनास्थळी पोहोचलेल्या मानपाडा पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती पलावा अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख सुधीर दुशिंग यांनी दिली. युवकाला बाहेर काढण्यासाठी अधिकारी दुशिंग यांच्यासह विकास चव्हाण, सुरेश गायकर या जवानांनी कसब पणाला लावले. संबंधित युवक हा भाडेकरू म्हणून या इमारतीत राहत होता. नोकरी गेली होती. त्यात बायको सोडून गेल्याने तो नैराश्याने ग्रासला होता. त्यात त्याला दारूचे व्यसन लागले होते. तर आजच त्याच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित केला गेल्याने तो आणखीच नैराश्यात गेला त्यात त्याने हे पाऊल उचले अशी चर्चा परिसरात सुरु होती.