डोंबिवली: दिवा येथील एका चायनीज खादयपदार्थ विक्रीच्या दुकानात कामाला होता. परंतू दुचाकी चालविण्याची हौस पुर्ण करण्यासाठी एकाने चक्क तीन दुचाकी चोरल्याचा प्रकार कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईत समोर आला आहे. गोपाळ अडसुळ (वय ५०) रा. डोंबिवली असे संबंधित चोरटयाचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
टिळकनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू होता. पोलिस हवालदार विश्वास माने आणि पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून तेथील सीसीटिव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एकजण चोरी केलेल्या दुचाकीसह काटई बदलापूर रोड, डोंबिवली पुर्वेकडील काटई नाका येथे येणार आहे.
ही माहिती मिळताच गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले, पोलिस हवालदार विश्वास माने, बालाजी शिंदे, विलास कडु, पोलिस नाईक दिपक महाजन, पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे आदिंच्या पथकाने घटनास्थळी सापळा लावून गुप्त बातमीदाराने केलेल्या वर्णनानुसार गोपाळ याला चोरी केलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत डोंबिवलीतील टिळकनगर, रामनगर आणि कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकूण तीन दुचाकीच चोरल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांनी दिली. पुढील कार्यवाहीसाठी आरोपी गोपाळला टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.