डोंबिवलीः रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात होणा-या फेरीवाला अतिक्रमणाविरोधात मनसेने घेतलेली आक्रमक भुमिका पाहता यापुढे मनाई केलेल्या परिक्षेत्रात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील अशी ग्वाही केडीएमसीचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी मनसेचेडोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांना बुधवारी पार पडलेल्या बैठकीत दिली. '
फेरीवाला अतिक्रमणा विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र गेले १६ दिवस पहायला मिळत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी १३ मार्चला केडीएमसीला १५ दिवसांची डेडलाईन देत फेरीवाला अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. डेडलाईन संपताच स्वतः आमदार पाटील यांनी शहर अध्यक्ष मनोज घरत आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह २८ मार्चला रस्त्यावर उतरत स्थानक परिसराची पाहणी केली होती. दरम्यान मनसेच्या आक्रमक भुमिकेनंतर आजतागायत संबंधित परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण झालेले नाही. सोमवारी पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष घरत यांनी मीटर रिक्षा स्टँड उभारण्याबाबत अधिका-यांसमवेत केलेल्या पाहणी दरम्यान फेरीवाल्यांनी आक्रमक होत घरत यांना आमच्यावर उपासमारीची वेळ का आणली असा संतप्त सवाल केला होता. त्यावर आम्ही तुमच्या विरोधात नाहीत तुमच्या पुनर्वसना संदर्भात आयुक्तांशी चर्चा झाली आहे पण १५० मीटर परिक्षेत्रात अतिक्रमण करण्यास आमचा विरोध कायम असल्याचे घरत यांनी संबंधित फेरीवाल्यांना सुनावले होते.
दरम्यान आज घरत यांची आयुक्त दांगडे यांच्याबरोबर मनपा मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केलेल्या १५० मीटर परिक्षेत्रात पांढरे पट्टे मारणे, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी शहर फेरीवाला समिती ची तातडीने बैठक लावणे, ग प्रभाग क्षेत्रातील फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाला पुरेसा कर्मचारी वर्ग पुरविणे आदिंवर चर्चा झाली. फेरीवाला अतिक्रमण हटविण्यात सातत्य राहीले पाहिजे आणि ती कारवाई प्रभावीपणे सुरु ठेवली आहे याबाबत घरत यांनी आयुक्त दांगडे यांचे आभार मानले. जर मनाई केलेल्या क्षेत्रात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी ग्वाही दांगडे यांनी घरत यांना दिली.