डोंबिवली: दुकान, शॉपवरील मराठी भाषेतील पाटयांचा मुद्दा सर्वत्र गाजत असताना डोंबिवली शहर मनसेच्या वतीने शुक्रवारी प्रशासकीय यंत्रणांना निवेदन देत मराठी भाषेत पाटया न लावणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली. जर कारवाई नाही झाली तर कार्यालयात तुम्हाला बसू देणार नाही असा सज्जड इशारा यावेळी दिला गेला.
मनसेच्या वतीने सातत्याने मराठी पाटया या विषयावर आंदोलने छेडली आहेत. उच्च न्यायालयाने देखील मराठी पाटयांबाबत सकारात्मक भुमिका घेत आदेश दिल्याकडे मनसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत यांनी लक्ष वेधले. शुक्रवारी कामत यांच्यासह अरूण जांभळे, उदय वेळासकर, संदीप (रमा) म्हात्रे, प्रितेश पाटील आदी पदाधिका-यांनी शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्त, केडीएमसीचे उपायुक्त, डोंबिवली सहाय्यक पोलिस आयुक्तांसह शहरातील चारही पोलिस ठाण्यांचे वरीष्ठ अधिकारी यांची भेट घेत न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे तसेच मराठी भाषेत पाट्या नसलेल्या दुकान, शॉप आणि इतर आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी केली.
केडीएमी उपायुक्तांकडून नियमानुसार कारवाई सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पण सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात मात्र कारवाई संदर्भात अपेक्षित उत्तर मिळाले नाही. यावर कामत भडकले. जर आपण कारवाई नाही केली तर आम्ही तुम्हाला या कार्यालयात बसु देणार नाही किंबहुना तुम्हाला इथे बसण्याचा अधिकारच नाही असे सुनावले. शहरातील प्रशासकीय यंत्रणांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे जर कारवाई नाही झाली तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल त्याला सर्वस्वी यंत्रणा जबाबदार राहतील असे कामत म्हणाले.