कल्याण : बहुचर्चित पत्री पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, या पुलाचे काम कित्येक वर्षे सुरू असल्याचे विरोधकांकडून भासविले जात होते. या पुलाचे काम पूर्ण होणार नाही, असे ते सांगत होते. अनंत तांत्रिक अडचणींवर मात करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुलाचे काम करून विरोधकांची बोलती बंद केली आहे. काम पूर्ण होईपर्यंत विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करीत असलेल्या खासदारांचा लोकार्पण सोहळ्यात संयम सुटला आणि त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
विरोधकांच्या टीकेला पूर्णविराम दिला असला तरी पायाभूत सुविधांच्या विकासाला कधीही पूर्णविराम मिळणार नाही, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. मुंबईतील गोखले पूल पडल्यावर रेल्वेने १०४ वर्षांच्या पत्री पुलाचे ऑडिट केले. त्यात पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने तो पाडण्यात आला. पुलाच्या कामाचे डिझाइन बदलावे लागले. हैदराबादहून आणलेला पुलाचा गर्डर बसवताना काही अडचणी आल्या. खासदारांनी या पुलाच्या कामासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला.
रेल्वेने रात्री घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे पहाटेपर्यंत गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले. पूल तयार होण्यास पाच ते सहा वर्षे लागतील, असे विरोधकांकडून भासविले जात होते. प्रत्यक्षात दोन वर्षांतील एक वर्ष हे तांत्रिक अडचणींत गेले. अनंत अडचणींवर मात करीत नऊ महिन्यांत पूल मार्गी लागला आहे. पुलाच्या कामाची डेडलाइन फेब्रुवारी असताना तो जानेवारीतच खुला झाला. पुलाच्या कामासाठी एमएसआरडीसी, रेल्वे आणि केडीएमसी यांचे प्रयत्न सुरू होते. पुलाच्या कामासाठी ५०० कर्मचारी झटत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यावर लक्ष ठेवून होते.
अन्य प्रकल्पांचीही कामे सुरूभिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम, दुर्गाडी खाडीवरील पूल, रिंग रोड, पलावा येथील पूल, काटई येथील रेल्वे उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वे, डोंबिवलीचा कोपर पूल मार्गी लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पत्री पुलाच्या कामामुळे विरोधकांच्या टीकेला पूर्णविराम मिळाला असला तरी कल्याण लोकसभा मतदारसंघातील पायाभूत विकासकामांना कधीही पूर्णविराम मिळणार नाही, असे सडेतोड उत्तर डॉ. शिंदे यांनी दिले आहे.