कल्याण: आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोमवारी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा मनसेला आणखी एक धक्का बसला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते नगरसेवक मंदार हळबे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यी उपस्थितीत मंदार हळबे यांनी भाजापत प्रवेश केला. मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केल्यानं कल्याण- डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
भाजपात प्रवेश केल्यानंतर मंदार हळबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मी लहानपणापासून भाजपासाठी काम केलं आहे. तसेच मला राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचं मंदार हळबे यांनी सांगितलं. तसेच 10 वर्षे ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असंही मंदार हळबे यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं.
राज ठाकरे अयोध्येत जात असल्यानं त्याचा आम्हाला आनंद आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील भाजपा राज ठाकरेंचं उत्तर प्रदेशात नक्कीच स्वागत करेल, असंही मंदार हळबे यांनी सांगितलं.
दरम्यान, राजेश कदम, मंदार हळबे या सारख्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे, हा मनसेसाठी एक मोठा धक्का मानला आहे. कारण कल्याण-डोंबिवलीत मनसेचा विस्तार आणि जनाधार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विश्वासातील नेते म्हणूनही राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी ओळख होती.
राजू पाटील यांची कृष्णकुंजावर धाव-
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजवर धाव घेत आज राज ठाकरे यांच्याशी जवळपास 35 मिनिटं चर्चा केली. राजेश कदम आणि मंदार हळबेंच्या पक्षांतरानंतर मनसेला डोंबिवलीत पडलेल्या खिंडारामुळे कृष्णकुंजवर व्यूहरचनेला सुरुवात झाली. मार्च महिन्यात कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.