डोंबिवली : वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे अशी ओरड होत असते. मात्र या कार्यक्रमामुळे या वाक्याला छेद मिळाला असून या कार्यक्रमामुळे वाचन संस्कृतीला चांगलाच वाव मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे पूर्ण महाराष्ट्रात वाचन संस्कृतीची एक लाट येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली येथे व्यक्त केले.
पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या वतीने डोंबिवलीमध्ये पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवसीय सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले, उदय निरगुडकर, लेखिका उमा कुलकर्णी, विशाल सोनी, पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गोडबोले यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले, फारच कल्पक असा हा कार्यक्रम आहे. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. पुस्तक वाचली जात नाहीत अशी ओरड कायम सुरू असते. मात्र या वाक्याना पै फ्रेंड्स लायब्ररीने पूर्ण छेद दिला आहे. इतका भव्य कार्यक्रम अनेक वर्षात मी बघितला नव्हता असे ते म्हणाले. मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा साठा आज मी येथे पाहिला असे सांगत पुस्तक लायब्ररी ऑनलाईन सुरू करणे आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवणे हे कठीण काम आहे आणि त्याहून कठीण आदान प्रदान सारखे कार्यक्रम घेणे हे आहे असे ते म्हणाले. मात्र पै हे खूप मोठे कार्य करत आहेत. त्यामुळे पुस्तक वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मला या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय उत्साह वाटला. अशा कार्यक्रमांमुळे सगळीकडे पुस्तक वाचनाची एक लाट येईल असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी यावेळी केले. डॉ. उमा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या, बहू भाषिक पुस्तकांचे हे आदान प्रदान आहे. या कार्यक्रमास त्या त्या भाषेतील लेखकांना बोलावून एक चर्चा सत्र ठेवावे असा सल्ला त्यांनी यावेळी आयोजकांना दिला.