कल्याण : आता तर धनुष्यबाणापेक्षा रॉकेट पण चालतात. त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. सणांनिमित्त पोलिसांवर ताण आहे. पण शिवसेनेच्या पदाधिकारी गुंडांना चार-चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो अशी टीका भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटावर केली.
कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारीणी नियुक्ती सभारंभ रविवारी पार पडला. यात गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाला लक्ष्य केले. या कार्यक्रमाला भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुले, प्रदेश सचिव माधवी नाईक, शशिकांत कांबळे, रेखा चौधरी, कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान भाजपचा महापौर कल्याण डोंबिवली महापालिकेत बसवायचाच आहे. त्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अंग झाडून कामाला लागले पाहिजे असे मत सर्वच वक्त्यांनी मांडले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले, यावेळी महापौर भाजपचा होणार आहे. फक्त कोण होणार हे ठरवायचे आहे. मागच्या महापालिका निवडणूकीत शिवसेना भाजपमध्ये महापौर पदावरुन घडलेल्या राजकीय घडामोडींची आठवण करीत देत चव्हाण यांनी भाजपचा महापौर बसणार होता. शेवटच्या क्षणी गडबड झाली. ही गडबड मातोश्रीवरुन झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. महापौर भाजपचा व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे आपल्याला संधी आहे. आत्ता फक्त महापौर कोण बसावयाचा हाच विषय आहे असेही चव्हाण म्हणाले.
कल्याण पूर्वेकरीता १२९ कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करुन आणला तो निधी आता दुसऱ्यांच्या नावाने वापरला जात आहे. शिवसेनेच्या लोकांनी आरक्षीत भूखंडावर बेकायदा बांधकामे केली आहेत. गणेशोत्सव, दिवाळी सण आता येऊ घातले आहेत. त्याच्या बंदोबस्ताकरीता पोलिसांवर मोठा ताण आहे. पोलिसांची मदत नागरीकांना होत आहे. पण शिवसेनेच्या पदाधिकारी आणि गुंडांना चार चार पोलिस संरक्षणासाठी दिले जात आहेत. यासंदर्भात मी पोलिसांना पत्र दिेले असल्याचे आमदार गायकवाड यावेळी म्हणाले.