लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एकिकडे दुचाकी आणि रिक्षा चोरीच्या घटना घडत असताना यातील एका चोरीच्या गुन्हयात एका गॅरेज मॅकेनिकसह रिक्षाचालकाला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वाहन चोरीच्या घटना कल्याण डोंबिवली शहरात सातत्याने घडत आहेत. पुर्वेकडील बंदिश हॉटेलच्या शेजारी चोळेगावाकडे जाणा-या रोडच्या कडेला पार्क केलेली रिक्षा चोरीला गेल्याची घटना २० एप्रिलच्या मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता.
दरम्यान वाहनचोरीच्या घटना पाहता कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील आठही पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोरटयांच्या शोध घेण्याकामी विशेष पथके नेमली आहेत. रामनगर पोलिस ठाण्यात अशा दाखल असलेल्या गुन्हयाच्या तपासकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार प्रशांत सरनाईक, विशाल वाघ, नितीन सांगळे यांसह अन्य पोलिस कर्मचा-यांचे पथक नेमले होते. रिक्षा चोरीची तक्रार दाखल होताच संबंधित पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता त्यामध्ये दोघेजण पार्क केलेली रिक्षा घेऊन जाताना दिसून आले. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहीती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना पिसवली, कल्याण येथून अटक केली. दोघेजण रिक्षाचे पार्ट विक्री करताना आढळुन आले.
श्रीकांत काशीराम शेडगे (वय ४९) रा. पिसवली, कल्याण पूर्व आणि विक्रम लक्ष्मण साळुंखे (वय ४३) रा. चोळेगाव ठाकुर्ली अशी अटक आरोपींची नावे आहेत. श्रीकांत हा गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणून काम करतो तर विक्रम हा रिक्षाचालक आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला दुचाकी चोरीचा गुन्हा देखील या दोघांच्या चौकशीत उघड झाल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी दिली. दोघांना दारूचे व्यसन जडले होते. ते भागविण्यासाठी ते वाहन चोरी करायचे आणि त्याचे पार्ट विक्री करायचे अशी माहीतीही तपासात समोर आल्याचे सानप म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"