सचिन सागरे
कल्याण : प्राणी आणि आपल्यामध्ये काही गोष्टी समान आहेत. मग आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरक काय आहे तर माणसाचे अस्तित्व आणि स्वभाव. मात्र आपण आपल्या कर्तव्याचे पालन केले नाही, आपल्या पलिकडे जाऊन आपण बघितले नाही तर प्राण्यांमध्ये आणि आपल्यात कोणताच फरक राहणार नाही. माणसाचा जन्म हा स्वार्थातून झाला असून तो स्वतःच्या पलिकडे जात नाही. मात्र, आपण सर्वांनी स्वतःच्या पलिकडे जाऊन बघण्याची गरज आहे. आज पुरस्कार प्राप्त झालेल्या या सर्व व्यक्ती आपल्या कार्यातून नेमका हाच संदेश देत आहेत की, स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करा असे मत जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केले.
कल्याणच्या के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात रविवारी संपन्न झालेल्या याज्ञवल्क्य आणि सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींचा डॉ. कोल्हटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कल्याण जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष वामनराव साठे यांचा याज्ञवल्क्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर, डंपिंग ग्राऊंडवरील मुलांसाठी अनुबंध संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रा. मीनल सोहनी आणि कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजावाडी रुग्णालयाच्या डीन डॉ. विद्या ठाकूर यांचा सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी याज्ञवल्क्य संस्थेचे विश्वस्त डॉ. सुरेश एकलहरे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अध्यक्ष आ. वा. जोशी, उपाध्यक्ष धनंजय पाठक, राधाकृष्ण पाठक, राजीव जोशी, प्रसन्न कापसे, अमोल जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.