लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आदिवासी बांधवांसाठी असलेल्या मेडिकलमध्ये भरती केलेल्या साडेचारशे जागांपैकी बोगस डॉक्टरांचा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (टीआरटीआय) माध्यमातून तपास करण्यात येणार आहे. त्यांच्या तपासानंतर बोगस जागा रिक्त करण्यात येतील, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी रविवारी येथे दिले. गोंडवाना मित्र मंडळाचा ३१ वा सामाजिक व सांस्कृतिक वार्षिक मेळावा कल्याणमध्ये झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पालिकांमध्ये आदिवासींसाठी असलेल्या अर्थसंकल्पाचा योग्य पद्धतीने विनियोग होत नाही. याबाबत संबंधित पालिकांमधील सगळ्या आयुक्त, समाज विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करून मागणी करणार आहे, असे झिरवळ म्हणाले. चंद्रपूर अथवा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यावे. १३ जिल्ह्यांमध्ये आदिवासीबहुल भाग आहे. त्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्याचा पालकमंत्री करा, अशी मागणी नेहमीच करत असल्याचे ते म्हणाले.
...तर राज्यसुद्धा चालवू शकतो
या खात्यात खूप आव्हाने आहेत. कारण मनुष्यबळ कमी आहे. साधनांची कमतरता असण्याबरोबरच राज्यात केवळ तीनच चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यांची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे खाते मला मुख्यमंत्री पदासारखेच वाटते आणि म्हणून विनोदाने म्हणतो की, मी सभागृह चालवले तर राज्यसुद्धा चालवू शकतो, असे झिरवाळ म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना झिरवाळ म्हणाले, दोघे एकत्र आले तर चांगले होईल, अशी चर्चा आहे.
राजीनामा मागणे बरोबर नाही
राजीनामा मागणे अथवा एखाद्यावर आरोप करणे हे बरोबर नाही. जो खरा दोषी असेल त्याचा तपास केला जाऊन त्याला कठोर शिक्षा केली जाईल. मात्र, कुणी तरी सांगावे व कोणी दोषी ठरवावे हे बरोबर नसल्याचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांनी भाष्य केले.