डोंबिवली : ज्यांनी नेहमीच भारत तोडण्याचे काम केले, ते आता भारत जोडो यात्रा करताहेत, असा टोला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला. ते रविवारपासून तीन दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
‘तुम्ही आज जय श्रीरामचे नारे देत आहात. पण यासाठी ४०० वर्षे लढाई लढावी लागली. न्यायालयात लढाई लढावी लागली. मात्र, आता पुढच्या वर्षभरात भव्य राम मंदिर तयार होईल. जे आपल्या सगळ्यांचे स्वप्न आहे, ते पूर्ण होईल,’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. महाराष्ट्र राज्यात आलेले सरकार हे विकासाचे काम करत आहे. हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी या मुद्द्यांचा पुनरूच्चार केला. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, आ. कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार आदींनी ठाकूर यांचे स्वागत केले.
कल्याणवर भाजपचा दावा नाही - ठाकूरकल्याण लोकसभा मतदारसंघात आमच्या मित्रपक्षाचे खासदार डॉ. शिंदे कार्यरत आहेत. पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे कार्य आम्ही करत आहोत, त्याचा एक भाग म्हणून हा दौरा आहे. या मतदारसंघावर दावा करण्याचा भाजपचा हेतू नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. शिंदे यांच्या निवासस्थानी ठाकूर यांनी मोदकाचा आस्वाद घेतला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रसाद मिळाल्याचे सांगितले. मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटते म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवायची, असे ते म्हणाले.
भाजपचा आढावा सुरू असला, तरी माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही, असे वक्तव्य खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. हा दौरा घोषित झाल्यापासून डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीला धोका, कल्याण मतदारसंघावर भाजपचा दावा, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या आता थांबवा, असेही ते म्हणाले. हा नियोजित दौरा होता. तो त्यांनी केला. सकारात्मक दृष्टीने त्या दौऱ्याकडे आम्ही पाहात असून, माध्यमांनी मसाला लावून बातम्या देणे थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आगामी काळात भाजप - शिवसेना यांच्यात युती होऊन निवडणुका लढवल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा मलाच उमेदवारी मिळेल आणि युतीच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यरत राहू, असेही डॉ. शिंदे म्हणाले.