कल्याण: वाहतुकीचा नियम मोडणा-या एका रिक्षाचालकाकडून वाहतुक पोलिस अधिकारी जबरदस्तीने दोनशे रूपयांची लाच घेतानाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार पुर्वेकडील चककीनाका येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात घडला आहे. दरम्यान रिक्षाचालकाकडून लाचेच्या स्वरूपात पैसे घेणा-या अधिका-यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहीती वरीष्ठ अधिका-यांनी दिली.
मोबाईमध्ये कैद केलेल्या या व्हीडीओमध्ये वाहतूक पोलिस अधिकारी एका रिक्षाचालकाकडे नियम मोडल्याप्रकरणी पाचशे रूपयांची मागणी करीत असल्याचे दिसत आहे. संबंधित रिक्षाचालक सुरूवातीला शंभर रूपये देत आहे. परंतू असे शंभर रूपये असेच येणारे जाणारे देतात. पांचशे रूपये दे असे तो अधिकारी रिक्षा चालकाला सांगताना दिसत आहे. यावेळी रिक्षाचालक मेताकुटीला येऊन शंभर रूपयांची नोट पुढे करत आहे. परंतू अजुन शंभर रूपये टाक असे जबरदस्तीने पोलिस अधिकारी सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर रिक्षावाला आणखी एक नोट काढून अशा दोन शंभराच्या नोटा त्या अधिका-याला देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
पैसे घेणारे अधिकारी हे पोलिस उपनिरिक्षक निवृत्ती मेळावणे असून या घटनेचा समाजमाध्यमावर व्हायरल झालेला व्हीडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान मेळावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहीती कोळसेवाडी वाहतुक युनिटचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र क्षीरसागर यांनी दिली.