पंकज पाटील
अंबरनाथ - घरपट्टीच्या माध्यमातून पालिकेची आर्थिक तिजोरी भक्कम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इमारत देखणी झाली असली तरी त्या इमारतीमध्ये घरपट्टी विभागाचीच एसी बंद असल्याने कर्मचाऱ्यांसह कर भरणाऱ्या नागरिकांना देखील गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. अंबरनाथ नगरपालिकेने तब्बल 45 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्वात आधी घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले.
इमारतीत सर्वात आधी तळमजल्यावर असलेला घरपट्टी विभागातील कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात आले होते. हे कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पालिकेतील इतर कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले. मात्र नव्या प्रशासकीय इमारतीमधील जे कार्यालय सर्वात आधी स्थलांतरित झाले त्याच कार्यालयामध्ये आता नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. जे कार्यालय नंतर सुरू करण्यात आले त्या कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र घरपट्टी विभागातील वातानुकूलित यंत्रणा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. मार्च अखेर असल्यामुळे या घरपट्टी विभागात शेकडोच्या संख्येने नागरिक घरपट्टी भरण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दोन ते तीन तास रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना देखील एसी नसल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी एसीची यंत्रणा असताना देखील ती अद्यापही सुरू न झाल्याने नागरिकांना देखील आहे त्या स्थितीतच कर भरून निघून जावे लागत आहे.
नागरिकांसोबतच या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याच गर्मीचा त्रास गेल्या अनेक दिवसांपासून सहन करावा लागत आहे. घरपट्टीसाठी भरण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा उकाडा आणखीनच वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांना घाम पुसतच या ठिकाणी पालिकेची आर्थिक तिजोरी भक्कम करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता एसी का चालू नाही त्याची आपल्याला माहिती नसल्याचे प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे. घरपट्टी विभागातील वातानुकूलित यंत्रणा का सुरू झाली नाही याची माहिती आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.