लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांच्या बाहेर तसेच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचत असतानाच आता कल्याण पूर्वेतील सूचकनाका परिसरातही स्वच्छतेचे तीनतेरा वाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्वेत कचरा उचलण्यासाठी केडीएमसीने कंत्राटदार नेमला आहे. परंतु, चार दिवसांपासून येथील कचरा उचलण्यात आला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
केडीएमसीने १० पैकी ‘ब’, ‘क’, ‘ड’ आणि ‘जे’ या चार प्रभागांतील कचरा संकलनासाठी कंत्राटदार नेमला आहे. परंतु, पूर्वेतील ‘जे’ प्रभागातील सूचकनाका परिसरातील नेतिवली टेकडी, महात्मा फुले नगरमधील कचरा दररोज उचलला जात नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. महापालिकेकडे तक्रार करूनही कचरा पडून राहत आहे. चार दिवसांपासून कंत्राटदाराचे कामगार कचरा उचलण्यासाठी फिरकले नसल्याने कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचले आहेत.
कचरा कुजल्यामुळे परिसरातील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. पायाखाली कचरा तुडवत अस्वच्छतेमधूनच नाक मुठीत धरून त्यांना ये-जा करावी लागत आहे. ही अस्वच्छता आजारांनाही आमंत्रण देत आहे. तसेच कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढला आहे. हा कचरा त्यांनी रस्त्यावर पसरवला आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन करणाऱ्या महापालिकेचे कंत्राटदाराच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
उपायुक्तांकडून प्रतिसाद नाहीकेडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शून्य कचरा मोहिमेंतर्गत चांगले उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, दररोज कचरा उचलण्याबाबत होत असलेली हलगर्जी चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.