अनिकेत घमंडी, डोंबिवली: विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाचा छंद वाढतो असून मुलांमध्ये राष्ट्रपुरुष, शास्त्रज्ञ, ऐतिहासिक क्षण, थरार, जादूचे प्रयोग या सर्व विषयांवरील आवड निदर्शनास येत आहे. आर्य गुरुकुल बोर्ड, अंबरनाथ येथे आणि आता सोमवारपासून विद्यानिकेतन डोंबिवली येथे पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तक प्रदर्शन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील बहुभाषिक पुस्तके हाताळली.
आर्य गुरुकुल अंबरनाथ येथे गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सम्राट अशोक यांची चरित्रे, रामायण,महाभारत, बोक्या सातबंडे, फेलुदा,फास्टर फेणे, डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके, विज्ञान विषयक चित्रकला, विश्वकोश, गणित विषयक, भूगोल, सुधामुर्ती यांची पुस्तके, राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, मुलांचे मासिके इत्यादी हजारोंच्या संख्येने पुस्तक प्रदर्शनात मांडण्यात आल्याचे पुंडलिक पै यांनी सांगितले. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके मांडण्यात आली.
तिसरी ते दहावीचे विद्यार्थि मोठ्या संख्येने इंग्रजी हिंदी मराठी भाषेतील पुस्तके खरेदी करीत आहेत अर्थात त्यांच्या पालकांच्या परवानगीने शाळेतील शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी सुद्धा प्रदर्शनाचा आनंद लुटत आहेत. विद्यानिकेतन शाळेत प्रदर्शनाला सुरुवात झाली असून शनिवार २६ ऑगस्ट पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. त्यासाठी शाळेने स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिले असून पालकांनाही त्यांच्या पाल्यांसोबत येण्याची मुभा देण्यात आली आहे.