अनिकेत घमंडी, डोंबिवली: येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २९ सप्टेंबर रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मंडळातर्फे डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात अमृतमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण केले. अमृतमहोत्सवी वर्षाचा लोगो टिळकनगरातील ज्येष्ठ आर्टिस्ट दत्ता म्हेत्रे यांनी बनवला आहे.
गणेश मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे, श्रीपाद कुलकर्णी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष दिपक काळे उपस्थित होते. अमृतमहोत्सवी वर्षात मंडळातर्फे वर्षभर अनेकविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु झाले आहे. जून्या टिळकनगरवासियांचे आणि टिळकनगरातील माहेरवाशीणींचे संम्मेलन आयोजित करण्याचाही मंडळाचा मानस आहे. अमृतमहोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जून्या आठवणी संकलीत करुन स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे असे या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे म्हणाले.