मयुरी चव्हाण
डोंबिवली - सांस्कृतिक उपराजधानी म्हणून डोंबिवली शहर ओळखलं जातं. आजही या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरे केले जातात. विशेष बाब म्हणजे डोंबिवलीतील तरुणाईने सुद्धा ही परंपरा कायम राखली आहे. गणेशोत्सव असल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. मात्र डोंबिवली शहरातील एक मंदिर गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलंय. कारण या मंदिरात बाप्पाचे दर्शन घेताना अजून एक गोष्ट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे बाप्पाची अनोखी आरास... टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत भारताला विविध मेडल्स प्राप्त करून दिलेल्या सर्व खेडाळूचं चित्र या ठिकाणी आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविक दर्शन घेवून झाल्यावर भारताच नाव अवघ्या जगात अजरामर करणाऱ्या खेळाडूबद्दल आवर्जून माहिती घेताना दिसत आहेत.
डोंबिवली पश्चिमेकडील पंडित दिन दयाळ रोड परिसरात असलेलं हे छोटसं गणपती मंदिर 1974 साली म्हात्रे कुटुंबीयांकडून बांधण्यात आलं आहे. परंपरेनुसार गणेशोत्सव काळात मंदिरातच दरवर्षी "श्रीं" ची प्रतिष्ठापणा केली जाते. भाविकांच श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळातही येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरात लहान मूल ज्येष्ठ नागरिक अनेकदा कुटुंब दर्शनासाठी येतात. अशा वेळी बाप्पांच्या आशीर्वादासोबत आजच्या पिढीच भविष्य उज्वल व्हावं तसेच प्रेरणादायी व्यक्तींमुळे एक नवीन उमेद निर्माण व्हावी या उद्देशाने खेळाडूंचे चित्र नावासह या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न म्हात्रे कुटुंबियांनी केला आहे.
म्हात्रे कुटुंबातील आजच्या पिढीतील युवक अमित म्हात्रे म्हणतात की, आम्ही सण उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी नेहमी जपण्याचा प्रयत्न म्हात्रे कुटुंबियांनी केला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. ऑलम्पिक खेळाडू विजेत्यांमध्ये दिव्यांग खेळाडूंनी सुद्धा बाजी मारली आहे. त्यामुळे दिव्यांग खेळाडूंनाही प्रोत्साहन देण्यासाठी विजेत्या खेळाडूंची ओळख या आरसाच्या माध्यमातून देण्यात आली आहे असेही ते म्हणाले.