कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवकांनी टाऊन प्लॅनिंग विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण आहे. प्रशासकीय राजवटीत माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे अशी माहिती कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भाेईर यांना दिली आहे. या प्रकरणी आमदार भाेईर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नगरसेवकांच्या आराेपात तथ्य असल्यास त्याची चाैकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार करणार आहे. प्रशासनाचा मनमानीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आमदार भाेईर यांनी दिला आहे.
३ मार्च राेजी शिवसेना नगरसेवकांची बैठक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतली. या बैठकीस कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे देखील ऑनलाईन उपस्थित हाेते. या बैठकीनंतर शिवसेना नगरसेवकांनी आमदार भाेईर यांची भेट घेतली. महापालिकेत नाेव्हेंबर २०२० पासून प्रशासयीक राजवट आहे. या कालावधीत टाऊन प्लॅनिंगमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.
अन्य विभागातही मनमानी कामकाज केले जाते. याबाबत चर्चा सुरु असताना आयुक्तांनी रस्ते विकास कामाचे पाच प्रस्ताव राेखून धरले. ज्या रस्त्यांचे प्रस्ताव दिले गेले. ते रस्ते सुस्थितीत हाेते असे कारण दिले गेले. यावरुन प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये तणाव असल्याचे दिसून आले. नगरसेवकांनी या प्रकरणाची सर्व माहिती आमदारांकडे सांगितली. नागरीकांच्या करातून मिळणाऱ्या पैशावर महापालिकेचा कारभार चालताे. बाहेरुन येणारे अधिकारी त्याला कुरण समजून चरण्यासाठी वापर करीत असतील तर ते मी हाेऊ देणार नाही. या प्रकरणी लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर टाकणार आहे असे भाेईर यांनी सांगितले.