कल्याण: येथील कोळसेवाडी पोलिस वाहतूक शाखेच्या वतीने बुधवारी फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई राबविण्यात आली. पुर्वेकडील टाटा नाका याठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १२ या तासाभरात राबविलेल्या विशेष कारवाई मोहीमेत वाहतूकीचे नियम मोडणा-या १६८ जणांवर गुन्हे दाखल करीत एकुण १ लाख १० हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहतुक नियमांचे पालन करा असे आवाहन वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून वेळोवेळी केले जात असतानाही वाहनचालकांकडून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना सिल्टबेल्ट वाहन चालविणे यासह सिग्नल मोडण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत चालली आहे. दरम्यान वाहतूक विभागाचे कल्याण परिक्षेत्राचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली, कल्याण पश्चिम आणि कोळसेवाडी वाहतूक शाखा अंतर्गत विशेष मोहीम राबवून वाहनचालकांना शिस्त लावण्याचे काम सुरू आहे.
याअंतर्गत वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन करताना प्रसंगी कारवाई केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी कोळसेवाडी वाहतूक पोलिस शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या वतीने फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई मोहीम राबविण्यात आली. टाटा नाका याठिकाणी तासाभरात केलेल्या या कारवाईत विनाहेल्मेट दुचाकी चालविणारे, विदाऊट सीटबेल्ट, ट्रीपलसीट, गणवेश न घालणे, रोड पार्किंग, पीयुसी नसणे, मोबाईलवर बोलणे, नंबर प्लेट ब्रोकन आणि कागदपत्रे नसणे अशा एकुण १६८ वाहनचालकांवर कारवाई करीत संबंधितांना एकुण १ लाख १० हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला तर १८ हजार ५०० रूपये ई-चलान वसूली केली गेली आहे अशी माहीती वरीष्ठ पोलिस निरक्षक क्षीरसागर यांनी दिली. या विशेष कारवाई मोहीमेत दोन पोलिस अधिकारी,९ पोलिस कर्मचारी आणि ४ वॉर्डन सहभागी झाले होते.