डोंबिवली: कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमुळे मंगळवारी इंदिरा गांधी चौकात ट्रॅफिक जाम झाला, त्यामुळे शेकडो डोंबिवलीकर नागरिक वैतागले. आधीच उन्हाने पारा ४३ गाठला असल्याने वातावरण तप्त असताना कोंडी झाल्याने अडकून बसल्याने नागरिक हैराण झाले.
सकाळी 10 वाजल्यापासून नेते आमदार आदित्य ठाकरे शहरात येणार असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क होती, परंतु तरीही ते आल्यानंतर व्हायचा तो गोंधळ झालाच, वाहतूक कोंडी।झाली. भगतसिंग रस्ता, फते अली पथ, बाजीप्रभू चौक, केळकर पथ, मानपाडा, चिपळूणकर लेन असे सगळे रस्ते कोंडीत अडकले. राजकारण तुमचे तुम्ही करत बसा आम्हाला जाऊ द्या अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.रस्ते अडवून मिळवता काय असा टोला देखील लगावला, लोकप्रतिनिधी हे समस्या सोडवतात पण निवडणूक काळात यांच्या सभा, रॅली यामुळे कोंडीत अडकायला होते ते बरोबर नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.
आता हे आणखी काही दिवस असेच सुरू राहणार असेल तर वाहतूक नियमन पोलीस यंत्रणेने, मनपाने आरटीओने एकत्र येऊन पर्यायी मार्ग काढायला नको का असा सवालही विचारण्यात आला. सातत्याने गर्दी करायची आणि रस्ते अडवून धरायचे हे कोणत्या नियमात बसते. रॅली काढताना नियमावली कडक करा, नियम तोडणाऱयायांवर कारवाई करा पण नागरिकांना दिलासा द्या. मोठमोठ्या वाहनांनी आधीच रस्ते अडवून ठेवून चालता येत नाही हे राजकीय नेत्यांना शोभत का असा सवाल विचारण्यात आला.