लोकमत न्यूज नेटवर्क बत्तिसावा रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत माघी गणेशोत्सवानिमित्त समाजामध्ये जनजागृती व्हावी वाहतुकीचे नियम सामान्य जनतेने पाळावेत अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मंगळवारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी चौक, सहजानंद चौक, या ठिकाणी माघी गणेशोत्सव निमित्ताने गणपती बाप्पाच्या प्रतिकात्मक भूमिकेत जय गजानन पाटील व आदित्य केशव मालुंजकर यांनी रिक्षा, कार व मोटरसायकल चालक यांना वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करणे गरजेचे आहे असा संदेश दिला.
पोलीस आयुक्तालय वाहतूक उपशाखा कल्याण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य आरएसपीचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथे हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्फत आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी सुरुवात झाली. याप्रसंगी एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळणे किती गरजेचे आहे याची जाणीव करून दिली. यावेळी यावेळी अधिकारी बन्सीलाल महाजन, गजानन पाटील, विजय भामरे आनंत जगे, पोलीस हवालदार श्याम जगताप पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी आदींनी सहकार्य केल्याचे शिंपी म्हणाले. या उपक्रमाबद्दल माजी नगरसेवक सुनील वायले यांनी कौतुक केले. रोटी डे ग्रुप,व स्वामीनारायण हॉलचे संचालक दिनेश ठक्कर,तरुण नागडा केतन शहा यांनी महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना १५ किलो अन्नधान्य किट दिले.
गांधीगिरी करत गुलाबपुष्प दिले भेट कार्यक्रमाच्या अखेरीस गजानन चौकात सीटबेल्ट न लावणाऱ्या कार चालक,हेल्मेट न घालता दुचाकी चालक यांना गांधीगिरीच्या मार्गाने गुलाब पुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळा, परिवाराची काळजी घ्या, व पोलीस विभागाला,आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.