मुरलीधर भवार । डोंबिवली
माझी मुले पाण्यासाठी वणवण फिरत होती. उन्हातान्हात फिरत होती. पाणी येत नसल्याने खदानीवर कपडे धुण्यासाठी माझी मुले, आई आणि भावजयीसोबत गेली. सोबत माझा पुतण्याही होता. त्यांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्यासाठी माझे कुटुंब बुडाले. आता मी काय करू आणि कोणासाठी जगू? आता तरी आम्हाला पाणी मिळणार आहे की नाही? पाणी मिळाले तरी माझी आई, भावजय, मुले आणि पुतण्या परत येणार नाहीत... हे सांगताना पाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्य गमावलेला जन्मदाता मनीष गायकवाड याला शोक अनावर झाला. तो ढसाढसा रडला. तेव्हा रुग्णालयात जमलेला जमावही नि:शब्द बनला होता.
देसलेपाडा गायकवाडवाडीत राहणारे मनीष गायकवाड हे रिक्षा चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गायकवाडवाडी परिसरात पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने त्यांची आई नीरा, भावजय अपेक्षा, मुलगा मयुरेश आणि मोक्ष, पुतण्या सिद्धेश हे पाचजण शनिवारी दुपारी भोपर देसलेपाडा आणि संदप या गावाच्या वेशीवर असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुण्यासाठी खदानीवर हे पाच जणच होते. अन्य कोणी नव्हते. कपडे धुण्याआधीच पाच जणांपैकी एक खदानीत पडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य चार जणांनी प्रयत्न केले. तेव्हा एकापाठोपाठ पाचही जणांना जलसमाधी मिळाली. त्याठिकाणी त्यांचे कपडे तसेच पडून होते. सोबत नेलेली दुचाकी आणि सायकलही त्याठिकाणी पडून होती. अग्निशमन दलाने पोहोचून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हा ते एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात मिठ्या मारून असलेल्या अवस्थेत आढळून आले.
पाणी येत नसल्याने कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबीय खदानीवर जायचे. काल नेमके ते मोबाईल घरीच विसरले होते. त्यामुळे संपर्कच करता आला नाही. काय झाले हे पाहण्यासाठी गावातील एक मुलगा खदानीवर गेला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. पाचही जण बुडाल्याचे कळताच गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.
पाणी येत नसल्याने रिक्षा चालविणारे मनीष यांच्यावर पाचशे ते हजार रुपयांचा टॅंकर मागविण्याची वेळ यायची. रिक्षा चालविणाऱ्यास दररोज टॅंकरचा खर्च कसा परवडणार? मग कपडे धुण्यासाठी आमच्या घरच्यांना खदानीत जावे लागायचे. पाणीटंचाईने माझ्या कुटुंबांचा जीव घेतला असे मनीष यांनी सांगितले.