डोंबिवली - Dombivali Blast ( Marathi News ) शहरातील केमिकल कंपनीत दुपारी बॉयलरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी इमारतीच्या काचा फुटल्या. जवळपास ३ किमी परिसरात स्फोटाचा आवाज घुमला. स्फोटामुळे कंपनीत आगडोंब उसळला, त्यात शेजारील कंपन्याही कचाट्यात सापडल्या. या स्फोटामुळे पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आहे असं चित्र पाहायला मिळतंय.
ज्याठिकाणी हा स्फोट झाला तिथून १ किमी अंतरावरील सोनारपाडा येथील एका बालरुग्णालयाच्या काचा फुटल्या. अक्षरश: काचांचा खच पडलेला दिसला. बंद पडलेल्या दुकानांचे शेटर तुटून आतमध्ये नुकसान झालं. रस्त्यावर पार्किंगला असणाऱ्या गाड्यांच्या काचा फुटल्या. इमारतीच्या घरांच्या काचा, दुकानांचे बोर्ड, चाळीतील पत्रे हेदेखील या स्फोटानं फुटलेले असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून २५-३० जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
डोंबिवली फेज २ मध्ये ही घटना घडली. स्फोटामुळे लागलेली आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या स्फोटामुळे २-३ किमी परिसरात मोठे हादरे बसले. यामुळे इमारतीच्या काचाही फुटल्या. त्यामुळे या स्फोटामुळे आणखी काही लोक जखमी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंबिवलीत अशाप्रकारे स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशाप्रकारे स्फोट झाले होते. मात्र त्यावर कुठलीही उपाययोजना केली नसल्याचं स्थानिकांचा आरोप आहे.
घटनेनंतर स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे पाहणी करायला पोहचले, त्यावेळी ते म्हणाले की, केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन ही आग लागली आहे. त्यात २५ ते ३० जखमी झालेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. गाड्यांचे नुकसान झाले आहे. लवकरच पंचनामे करून त्यांना भरपाई दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
स्फोटाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू - मुख्यमंत्री
डोंबिवली स्फोटात ४ लोकांचा मृत्यू झाला असून सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल तसेच वैद्यकीय पथक दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. सध्या बचावकार्याला प्राथमिकता देण्यात आली असून त्यानंतर या दुर्घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.