लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था आणि नांदिवली येथील गणराज इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध प्रजातीच्या आंबा, जांभूळ, कडुलिंब, सुपारी, बहावा, तुती, बोगनविलिया, पारिजात, बेगम बहार आदी वृक्षारोपण मान्यवर आणि विद्यार्थी यांच्याद्वारे शाळेच्या सभोवतालच्या परिसरात करण्यात आले.
स्थानिक संस्थेच्या वतीने दरवर्षी १ जुलै ते १५ जुलै दरम्यान वृक्षारोपण पंधरवडा उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमास स्काऊट गाईड संस्थेचे सचिव दिलीप तडवी, सहा जिल्हा आयुक्त जगन्नाथ सपकाळे, उपाध्यक्ष बी. एन. भोसले, ट्रेनिंग कौन्सिलर प्रवीण खाडे तसेच नांदिवली गावचे माजी सरपंच तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे कुस्ती संघाचे अध्यक्ष पंढरी ढोणे, शाळेच्या अध्यक्षा शामा म्हात्रे, संचालक संजय म्हात्रे, गणराज म्हात्रे यांच्यासह शिक्षकवर्ग आणि स्काऊट गाईडचे लीडर, कॅप्टन, स्काऊट गाईड विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी, सर रॉबर्ट बॅडेन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यांचे महत्व उपस्थित मान्यवरांच्या भाषणाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता जाधव यांनी केले.