कल्याण: कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजनजीक असलेल्या आदीवासी पाडय़ावर नागरी सुविधांची वानवा आहे. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणा:या कल्याण डोंबिवली शहरातील आदिवासी सुविधांपासून वंचित आहेत.
या प्रकरणी भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे काम पाहणारे राहूल देठे यांनी या प्रकरणी राष्ट्रीय अनूसूचित जाती जमाती आयोगाला तक्रार करुन आदिवासीयांच्या समस्येकडे आयोगाचे लक्ष वेधले आहे. आयोगाने त्याची दखल घेत महापालिकेने तात्काळ स्वच्छतागृह उपलब्ध करुन द्यावे असे सूचित केले आहे. बिर्ला कॉलेजनजीक असलेल्या या आदीवासी पाडय़ावर आज मितीस 25 कुटुंबे राहतात. या पाडय़ावर शौचालयाची सुविधा नाही. या पाडय़ावरील महिलांना कुचंबणा सहना करावी लागते. रात्रीच्या अंधाराची वाट या महिला पाहत असतात. तेव्हा कुठे त्यांना अंधारात विधी उरकावा लागतो. शहराच्या मध्यभागी असलेल्या या पाडय़ाची ही अवस्था आहे.
यासंदर्भात महापलिका प्रशासनाकडे विचारणा केल्यास त्यांनी सांगितले की, शौचालय बांधण्याकरीता निविदा काढण्यात आली आहे. निविदा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच स्वच्छता गृहाच्या कामाला सुरुवात केली जाईल. एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्प राबवित आहे. हा प्रकल्प १ हजार ४४५ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यापैकी बहुतांश कामे प्रगतीपथावर आहे. स्मार्ट सिटी होत असताना आदिवासी बांधव विकासाच्या लाभापासून वंचित राहिला आहे. याकडे देठे यांनी लक्ष वेधले आहे. या वस्तीत पक्की घरे नाहीत. दोन तीन पिढय़ा त्यांच्या या ठिकाणी गेल्या. त्याठीकाणी पाण्याचा एकच नळ आहे. महापालिकेने या वस्तीत फीरते शौचालय उपलब्ध करुन दिले होते. मात्र त्याची दुरावस्था झाली आहे.