कल्याण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाशिक येथील हरिहर गडाच्या बाजूचा भीमकाय कडा म्हणून ओळखला जाणारा स्कॉटिश कडा कल्याणच्या सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरने सर करीत राज्याच्या निर्मितीत योगदान दिलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनी आदरांजली वाहीली.
स्कॉटिश कडा हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर याठिकाणी आहे. सुमारे 550 फूट भली मोठी उंची असलेला हा कडा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतर कड्यांपैकी सर्वात उंच आणि गिर्यारोहण क्षेत्रात तांत्रिक गोष्टीचा विचार केला, तर कड्याच्या वरून ते कड्याच्या पायथ्यापर्यंत गिर्यारोहणाचा सेटअप लावणारा एकमेव कडा आहे. विशेत: इतर ठिकाणी पायथ्यापासून सुरुवात करून वर जातानाचा सेटअप लावला जातो. स्कॉटिश कड्याला जायला मुख्यत्वे दोन मार्ग लागतात. एक म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या निरगुडपाडा येथून तर दुसरा मार्ग हर्षेवाडीतून आहे.
रविवारी महाराष्ट्र दिनी या विशेष मोहिमेची निरगुडपाडा येथून सुरूवात झाली. सुमारे दोन तासांचा ट्रेक करत स्कॉटिश कड्याच्या पायथ्याशी सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर संघ पोहचला. खांद्यावर भगवे झेंडे आणि गिर्यारोहणाचे अवजड साहित्य घेऊन आरोहणाची सुरु वात झाली. कड्यावर दोरीच्या सहाय्याने सेटअप लावला होता. त्यावर झुमरिंग करून एक एक गिर्यारोहक हा हळू हळू कड्याच्या टोकाकडे वाटचाल करत होता. सुमारे सहा स्टेशनमध्ये विभागलेला स्कॉटिश कडा ज्यावर प्रत्येक स्टेशनवर सहकार्यासाठी नेमलेले सहयाद्री रॉक अॅडव्हेंचरचे स्वयंसेवक इतरांना वर यायला मदत करत होते. कडा खूप उंच असल्याने तो सर करताना संबंधित गिर्यारोहकांची दमछाक झाली.
दरम्यान ही मोहीम सुखरूप पार पडावी म्हणून कड्याच्या पायथ्याशी शिवरायांची आरती करण्यात आली तसेच कड्याला धन्यवाद म्हणून कड्याचे पूजन करण्यात आले. या मोहीमेत सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, प्रदीप घरत, नितेश पाटील, सुनील खनसे, कल्पेश बनोटे आणि प्रशिल अंबाडे हे सहभागी झाले होते. यांच्यासह सहभागी झालेली लहान मुलगी ग्रीहीता विचारेही या मोहीमेची विशेष आकर्षण ठरली.