कल्याण : कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या एफ केबीन रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आज शिवसेना व भाजपने एकाच रस्त्याचे उद्घाटन केल्याने रस्त्याचे श्रेय घेण्यावरुन दोन्ही पक्षात चढाओढ निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कामाचे क्षेय घेण्यावरुन भाजप आमदाराने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
एफ केबीन रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रस्ता कामाकरीता एक महिना वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महापालिकेने ४ कोटी ३५ लाख रुपये खर्च करुन हा रस्ता तयार केला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. आज सकाळीच शिवसेनेचे धनंजय बोडारे यांच्यासह नगरसेवक रमेश जाधव, शरद पाटील, परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले. या रस्त्याच्या कामाकरीता पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक शिवसेना नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी हा रस्ता वाहतूकीसाठी खुला केला आहे.
शिवसेनेचा कार्यक्रमानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी भाजप कार्यकत्र्याच्या उपस्थितीत एफ केबीन रस्त्याचे उद्घाटन केले. या रस्त्यासाठी आमदार गायकवाड यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. तसेच कोणाच्याही बापाला बाप बोलायचे आणि नारळ फोडायचे अशी टिका करीत ज्यांना क्षेय घ्यायचे असेल त्यांनी घ्यावी. मात्र लोकांना चांगले माहिती आहे की, रस्त्यासाठी कोणी प्रयत्न केले अशी टिका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. निधी मंजूर झाल्यावरही महापालिकेडून या कामात दिरंगाई झाली आहे.
निवडणुका आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांची घोषणा करुन दिले नाही अशी टिका करतात. फडणवीस यांनी चारशे कोटी रुपये महापालिकेस दिले. तेच महापालिकेस निट वापरता आले नाही. तर साडे सहा हजार कोटी रुपयांचे यांनी काय केले असते असा खोचक सवालही आमदार गायकवाड यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. निवडणूका आल्यावर हे जागे झालेले आहेत. शेतक:यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. साधी पाच हजार रुपये देखील नुकसान भरपाई दिलेली नाही याकडे आमदार गायकवाड यांनी लक्ष वेधले.