डोंबिवली - २०२२ मध्ये शहरातील मिलापनगर भागात राहणा-या एका डॉक्टरच्या बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून घरातील सोने चांदीचा ऐवज लांबविणा-या दोन सराईत चोरटयांना मानपाडा पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून अटक केली आहे. त्यांच्याकडून २२ लाख ७७ हजार ८०० रूपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त केला गेला असून चौकशीत चार गुन्हे उघडकीस आले आहेत. चिंटू चौधरी निशाद ( वय ३५) आणि बबलू उर्फ राजेश बनारसी कहार ( वय ४० ) दोघेही रा. दिवा पण मुळचे दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत.
घरफोडीसह अन्य चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्यावतीने शहरातील चार ही पोलिस ठाण्यांमध्ये विशेष पथके नेमण्यात आली आहेत. मानपाडा पोलिस ठाण्यातही वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी केलेल्या तपासात निशाद आणि कहार या घरफोडी करणा-या अट्टल चोरटयांना अटक झाली आहे. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राहुल मस्के यांना घरफोडी चोरटयांच्या बाबतीत गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलिस निरिक्षक संपत फडोळ व गुन्हे प्रकटीकरण पथक उत्तरप्रदेश सिध्दार्थनगर जिल्हयामधील ग्राम किंशुन्धर ज्योत गावाकडे रवाना झाले. तेथे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन निशाद आणि कहार या दोघांना घरातून जेरबंद केले. आरोपींकडून ३२५.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण २२ लाख ७७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२० गुन्हयांत आधीही झालेली अटक
दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून यापुर्वी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिक्षेत्रातील १३ गुन्हयात बबलू कहार तर चिंटू निशाद यास एकुण ७ गुन्हयात याआधी अटक झाली आहे. आता पोलिसांच्या चौकशीत मानपाडा पोलिस ठाण्यातील चार गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.