कल्याण: कल्याण पूर्व भागात आज सायंकाळी दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनेत जिवीत हानी झालेली नसली तर एका घटनेत जीओची केबल जळून खाक झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत घर जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली आहे.
आज सायंकाळी लोकग्राम परिसरातील एका गवताच्या गंजीला आग लागली. या गवताच्या गंजी शेजारी जीओचा मोबाईल टॉवर आहे. त्याठिकाणी जीओ कंपनीची केबल होती. आगीत ही केबल जळून खाक झाली आहे. या घटनेत जिवीत हानी झालेली नाही. ही आग गदरुल्ल्यांनी लावली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तर दुस:या घटनेत तीसगाव परिसरातील अक्षय गायकवाड यांच्या घराला सव्वा सहा वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत गायकवाड यांचे घर जळून खाक झाले आहे. आग लागली तेव्हा गायकवाड कुटुंबिय घराबाहेर होते. त्यामुळे याठिकाणीही जीवित हानी टळली आहे. घरातील इन्व्हर्टरमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीची माहिती मिळताच भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अग्नीशमन दलाने दोन्ही ठिकाणी तातडीने धाव घेऊन आग विझविण्याचे काम केले आहे.