अनिकेत घमंडी, डोंबिवली-कल्याण: मुलांनी वाचनाकडे वळावे या हेतूने अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून अखंड ३६ तासांचा वाचन यज्ञ प्रल्हाद केशव अत्रे नगरी बालक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये २२ शाळा आणि ४० हून अधिक वाचन विषयक कार्य करणाऱ्या संस्थांसह १२०० वाचकांनी विविध वाचन सत्रामध्ये उपस्थित राहून वाचन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी झाले तर समारोप रविवारी मध्यरात्री झाला.
शुभारंभाच्या सत्रामध्ये प्रख्यात अभिनेते व कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी सांगितले की वाचन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे , ते चटकन व्हायरल होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचनाशी नाळ जुळणे महत्वाचे असते , एकदा का नाळ जुळली की ती आपल्याला यश देते. वाचन हे एका दिवसापुरते न राहता ते सातत्याने केले पाहिजे असे प्रतिपादन कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी केले. साने गुरुजी यांच्या आईच्या जीवनावरील मालिकेतील बालकलाकार वरदा देवधर हिने आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की , वाचनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे मी अभ्यास व अभिनय या दोन्ही गोष्टींची सांगड घालू शकले. त्या प्रसंगी डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या वाचनरंग या वाचन विषयक मान्यवरांच्या मुलाखती व लेख असलेले पुस्तक मान्यवरांचे प्रकाशित करण्यात आले.
या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी , बालक मंदिर संस्था कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचा समारोप सत्रामध्ये बोलताना कुटुंब रंगलंय काव्यात फेम विसुभाऊ बापट आपल्या भाषणात कुटुंब रंगलंय काव्यात ची जन्मकथा उलगडवून दाखविताना म्हणाले की वाचनामुळे मला कविता कशी वाचावी त्यावर संस्कार कसे करावे हे कळलं आणि त्यातून कुटुंब रंगलय काव्यात या विश्व विक्रमी कार्यक्रमाची निर्मिती झाली. आपल्या भाषणात त्यांनी काव्यवाचन विषयक अनेक दाखले, किस्से सांगून विविध कविता सादर केल्या आणि कार्यक्रमात रंग भरला. मोबाईल फोन, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या आजच्या युगात वाचनाची सवय आता खूप कमी होत चालली आहे. मात्र त्यांच्या वापराबाबत स्वतःला अनुशासन लावणे आवश्यक आहे. विशेषतः मुलांमध्ये वाचन, व्यायाम, मैदानी खेळ ह्यांचा डिजिटल उपकरणांच्या वापराशी समतोल साधला गेला पाहिजे, असे विचार प्रख्यात शल्य विशारद डॉ आशिष धडस यांनी समारोप सत्रात मांडले. या प्रसंगी मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे , महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम निमिष कुलकर्णी व बालक मंदिर संस्थेचे कार्यवाह डॉ सुश्रुत वैद्य यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी, डॉ प्रकाश माळी यांनी केले व आभार प्रदर्शन हेमंत नेहते यांनी केले.
सलग ३६ तास आणि एकत्रित २०० हून अधिक तास रंगलेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन सत्र , वि. आ. बुवा वाचनसत्र , बाबासाहेब पुरंदरे वाचन सत्र, मंगला नारळीकर वाचन सत्र , शांताबाई शेळके वाचनसत्र , कवी केशवसुत वाचनसत्र, नारायण धारप वाचनसत्र, वामनदादा कर्डक वाचनसत्र, अण्णाभाऊ साठे वाचनसत्र डॉ.ए पी वाचन सत्र, जी . ए.कुलकर्णी वाचनसत्र, गंगाधर गाडगीळ वाचन सत्र , सुधाताई करमरकर वाचनसत्र ना. धो. महानोर वाचनसत्र , नलेश पाटील सत्र अशा विविध सत्रांमध्ये कथा, कविता , ललित , नाट्य , एकांकिका , लेख आदी विविध साहित्य प्रकार सादर केल्याची माहिती संस्था सचिव हेमंत नेहते यांनी दिली.