कल्याण-अंमली पदार्थाची तस्करी करताना दोन पोलिसांना ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे महेश वसेकर आणि रवि भिसे अशी आहेत. हे दोन्ही पोलिस कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ९२५ ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले आहे.
ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, दोन जण कल्याणच्या दुर्गाडी चौकात चरस घेऊन येणार आहेत. ते कल्याणहून चरस घेऊन ठाण्याच्या दिशने जाणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या पोलिस पथकाचे अधिकारी संजय शिंदे यांनी दुर्गाडी चौकात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोन दुचाकी स्वार त्याठिकाणी आले. पोलिसांनी त्यांचा संशय होता.
पोलिसांनी त्यांना अडविले त्यांची बाईकसह तपासणी केली. त्यांच्याकडे ९२५ ग्रॅम चरस मिळून आले. ज्या दोन दुचाकी स्वारांकडे चरस मिळून आले ते दोघेही पोलीस होते. ही बाब कळताच नार्कोटीक्स पथकाचे पोलिस हैराण झाले या दोघांना पथकाने पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केले. त्या दोघांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची कारवाई सुरु असताना त्याच कारवाईत चक्क दोन पोलिसांकडे चरस सापडल्याने कारवाई पथकही थक्क झाले आहे.
या दोघांकडे चरस कुठून आले असा प्रश्न निर्माण झाले आहे. हे दोघेही पोलीस कल्याणहून ठाण्याला ते चरस कोणाला देण्यासाठी किंवा विकण्यासाठी निघाले होते. हे दोघेही पोलीस कल्याण रेल्वे पोलिसात कार्यरत असल्याने काही दिवसापूर्वी कल्याण रेल्वे चरस मिळून आले होते. ही कारवाई बहुधा या दोघांनी केली असावी. ते चरस हे विकण्यासाठी जात असताना पकडले गेले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरण अन्य कोणाचा सहभाग आहे की नाही या अंगाने तपास पथक पुढील तपास करीत आहेत.