डोंबिवली- कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पुर्वेकडील गौरीशंकर वाडीतील एका घरातून दोन तलवारी आणि एक चाकू हस्तगत करण्यात आला आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Two swords, knives seized from house in Dombivli; One arrested)
संदीप काष्टे व त्याचा मित्र रवि पवार हे घातपात करण्याच्या हेतूने तलवारी, चाकू व इतर धारदार हत्यारे जमा करून काष्टे राहत असलेल्या गौरीशंकरवाडीतील दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये जमले आहेत, अशी माहीती गुप्त बातमीदारामार्फत 30 जूनला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.
यानंतर, सहाय्यक पोलिस निरिक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून, मोहन कळमकर, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, दत्ताराम भोसले,अजित राजपूत, मंगेश शिर्के,सचिन वानखडे, हरिश्चंद्र बंगारा, सचिन साळवी आदिंनी गौरीशंकर वाडी, एस.व्ही. रोड, मंजुनाथ टॉवर गार्डनचे मागे धाड टाकली. त्या ठिकाणी रवि राजू पवार (वय 19 वर्ष ) हा आढळून आला. तर संदीप काष्टे तेथून आधीच पसार झाला होता. घराची झडती घेतली असता त्याठिकाणी दोन तलवारी आणि 1 चाकू आढळून आला.
काष्टेचा शोध सुरू आहे त्यांनी शस्त्र कोठून आणली व आरोपी हे शस्त्रांसह काही घातपात करणार होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत.