डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी मधील धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानात काल सायंकाळी/रात्रीचा वेळेस एकाच ठिकाणी दोन मोठे आकाशिया जातीचे वृक्ष पावसामुळे कोसळले. सुदैवाने त्यावेळी उद्यानात खेळण्यासाठी येणारी लहान मुले आणि फेरफटका, चालण्यासाठी येणारे वरिष्ठ नागरिक तेथे नसल्याने कोणतीही दुर्दैवी घटना झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच तेथेच जवळ राहणारे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि शिवसेना उपशाखाप्रमुख सागर पाटील यांनी अग्निशमनदलाला कळविले.
अग्निशमनदलाने सदर वृक्षांचा मोठ्या फांद्या तोडून ते उद्यानाचा कडेला एका बाजूस आणून ठेवले आहे. धर्मवीर आनंद दिघे बालउद्यान हे सन 2002 मध्ये तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महापालिका यांनी एमआयडीसी कडून भूखंड घेऊन विकसित केले होते. सदर उद्यान उद्घाटनसाठी शिवसेना नेते मधुकर सरपोद्दार आणि धर्मवीर आनंद दिघे उपस्थित होते. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून 2017 साली याचे सुशोभीकरण करण्यात आले होते.
याच धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानाची गेल्या तीन वर्षापासून अतिशय खराब दुर्दशा झाली असून झाडी झुडपे वाढली आहेत तर लहान मुलांची खेळणी मोडकळीस आलेली आहेत. उद्यानाभोवती असलेले सुरक्षा कुंपण/जाळी काही ठिकाणी तुटलेले आहे. यामुळे गैरप्रकार करणारे लोक रात्रीचा वेळेस यात प्रवेश करतात. या उद्यानातील झाडांच्या फांद्याची छाटणी वेळोवेळी केली गेली पाहिजे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा प्रकाश पडून येथे चालणारे गैरप्रकार थांबतील आणि भविष्यात झाडेही पडणार नाहीत. येथील स्थानिक नागरिकांनी केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना याबाबत कळवूनीही याची दखल घेतली गेली नाही आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने आणि त्यांचा पदस्पर्शाने निर्माण झालेल्या या बालउद्यानाची कमीतकमी देखभाल, दुरुस्ती, निगा ही केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन केली पाहिजे अशी अपेक्षा येथील निवासी भागातील नागरिक व्यक्त करीत असल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले.