डोंबिवली - एकिकडे शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना सायकलचोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना विष्णुनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मास्टर की चा वापर करून दुचाकी चोरणारा चोर हा व्यवसायाने टेलर आहे. मोहम्मद इसाक युनुस खान (वय ५४)रा. आजदेपाडा, डोंबिवली पूर्व, असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगरमध्ये २ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी १२.३० या कालावधीत भरदिवसा सायकल चोरीचा गुन्हा घडला होता. याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासकामी वरीष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक कुलदीप मोरे यांचे विशेष पथक नेमले होते. दरम्यान मंगळवारी गुप्त बातमीदारामार्फत पथकातील पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना मिळालेल्या माहीतीवरून मोरे यांच्या पथकाने ठाकुर्ली पुर्वेकडील ९० फिट रस्ता येथून मोहम्मद खान याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने सायकल चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने विष्णुनगरमध्ये ३ , रामनगर ५ , टिळकनगरमध्ये १ आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ अशा ११ मोटारसायकली मास्टर की चा वापर करून चोरल्याचे आणि त्यांची विक्री केल्याचे समोर आल्याची माहीती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.चोरीच्या गाड्या विकण्यासाठी लढवायचा शक्कल -चोरीच्या गाड्या विकण्यासाठी मोहम्मदने अनेकांना चुना लावला. एखादा पालखी सोहळा हेरून त्यात सहभागी असणाऱ्या लोकांशी ओळख काढून तो गोड गोड बोलायचा आणि विश्वास संपादन करून त्यांना गाड्या विकायचा. डोंबिवलीमध्येच त्याने चोरीच्या गाड्या विक्री केल्या होत्या. या सर्व गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.