मुरलीधर भवार, कल्याण: शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये दोन वर्षांची मुलगी झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. डब्यातील प्रवाशांना लक्षात येताच तिच्यासोबत कुणी आहे का, यांचा शोध घेऊनही कुणीही आढळून न आल्याने प्रवाशांनी याबाबत रेल्वेपोलिसांना माहिती दिली. रेल्वेपोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. तिचा हात फ्रॅक्चर असल्याने रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिला बालगृहात पाठवण्यात आले. कल्याण रेल्वे पोलिसांनी या मुलीला कुणी तरी जाणीवपूर्वक एक्स्प्रेस गाडीत सोडून दिले असल्याचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.
बुधवारी दुपारच्या सुमारास शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये काही प्रवाशांना दोन वर्षांची मुलगी एकटीच झोपली असल्याचे लक्षात आले. कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार प्रवाशांना समजल्यानंतर प्रवाशांनी डब्यात विचारपूस करत तिच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला, मात्र कोणीच आढळून न आल्याने प्रवाशांना संशय आला. त्यांनी दादर येथे उतरून या दोन वर्षाच्या चिमुकलीला दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. या मुलीवर उपचार करून रेल्वे पोलिसांनी तिला बालगृहात पाठवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी या मुलीला एक्स्प्रेसमध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचा संशय आहे.