Badlapur School Case : बदलापूरच्या आदर्श विद्यालयात एका चार वर्षांच्या आणि सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण बदलापूरात उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोट करण्यात आलीय. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर जमावाने कारवाईची मागणी करत पोलिसांवर दगडफेक केली आहे. या प्रकरणी आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत कोणतेही राजकारण न करता आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी करत रेलरोको करण्यात आला आहे. दुसरीकडे, ज्या शाळेत ही घटना घडली तिथे तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी असे म्हटलं आहे.
"अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे. आपल्याकडे अशी पद्धत सुरु झालीय की अशा घटनांचे राजकारण केलं जात आहे. लाडकी बहीण योजना आणत असताना लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. एखाद्या राज्यात काय देशात कुठेही अशाप्रकारची घटना होता कामा नये. या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला वेळ लागला. एखाद्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या घटनेसाठी ते गुन्हेगार जबाबदार असतात तसेच त्यावर न्यायनिवाडा करुन शिक्षा देण्यात दिरंगाई करणारे देखील जबाबदार धरले पाहिजेत. हे झालं तर अशा गोष्टींना आळा बसेल. कुठेही काही घडलं तरी कोणीही सुटता कामा नये. सगळेजण पक्ष जात पात विसरून एकत्र झाले तरच आपल्या राज्यातील महिला सुरक्षित राहतील. तरच आपण माझ्या राज्यातील महिला ही लाडकी बहीण आहे असं म्हणू शकतो," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
"शक्ती विधेयक कायदा आम्ही आणू शकलो नाही कारण गद्दारी करुन आमचं सरकार पाडलं गेलं. ज्यांनी गद्दारी केली त्यांची जबाबदारी आहे या शक्ती कायद्याची शक्ती गुन्हेगारांना दाखवून देण्याची. मला असं कळलं आहे की ती शाळा भाजपच्या लोकांशी संबधित होती. याच्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. जर का हा भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून सोडून देणार आहात का? कुठेही राजकारण न करता कारवाई झाली पाहिजे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.