मुरलीधर भवार, कल्याण : उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या विजयाची सभा कुठे घेणार याचे ठिकाणच जाहिर केले. विजयाची सभा अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिरासमोर घेणार असल्याचे जाहिर केले. लोकसभा निवडणूकीत गद्दा्रांना गाडा असे आवाहन शिवसैनिकांनी ठाकरे यांनी यावेळी केले. सगळे भाड खाऊन मिंधे गटात गेले आहेत. कल्याणच्या शिवसैनिकांना भेटायला आलो आहे. कल्याण जिवंत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी, वंचित आणि आरपीआयचे लोक आहे. एक वेगळीच एकजूट दिसते. कल्याण लोकसभेवर एक वेगळी जबाबदारी आहे. गद्दारींची घराणेशाही गाडून टाकायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यास कलंक लावणारा एक सुद्धा गद्दार महाराष्ट्रात जन्माला येता कामा नये.
आज मी अंबरनाथच्या शिवमंदिरात गेलो होते. काल मोदीजी काळाराम मंदिरात जाऊन आले. आज मिंधे इथेच कुठे तरी स्वच्छ लादी स्वत:च्या पावलांनी कलूषित करीत आहेत. साफसफाई आधीच कोणाकडून घ्यायची नंतर छान कपड्यात केवळ फडकं फिरवायचे. त्यांनी तशी धुणीभांड्याची सवय आहेच. त्याच्याठीच ते दिल्लीला जातात. साफसफाई करायची असेल तर अंबरनाथ मंदिरात जाताना जो नाला आहे. त्या नाल्याची साफसफाई करा. मिंधेना आव्हान आहे. मोदींजीना सांगणे आहे. त्यांनी त्यांच्या जादूच्या झाडूने तो नाला साफ करुन द्या असे आवाहन ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत, खासदार राजन विचारे यांच्यासह पदाधिकारी शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, सचिन बासरे आदी या प्रसंगी होते.
ठाकरेंचे कल्याणमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. भगवे झेंडे, फूलांची उधळण, भगव्या टोप्या परिधान करुन शिवसैनिक ढोल ताश्यांच्या गजरात नाचत ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. ठाकरे यांनी शाखेत प्रवेश करताच एकच गर्दी उसळली. या गर्दीत काही शिवसैनिकांची चेंगराचेंगरी झाली. अनेक तरुण शिवसैनिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ठाकरे आगमानासह भाषणाचे शूटिंग करण्यात दंग हेाते.