उल्हासनगर : कॅम्प नं-३, येथिल एका गौशाळेतील दुरावस्थेवरून सामाजिक संघटनेने ठिय्या आंदोलन केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी गौशाळेची पाहणी करून दंड ठोठाविला आहे. या गौशाळेतील मुंबई येथे उपचारासाठी नेलेल्या जखमी गायीचा मृत्यू झाला असून शहरातील गौशाळेच्या चौकशीची मागणी होत आहे.
उल्हासनगरातील गौशाळेत गायीची काळजी घेतली जात नसल्याचा प्रकार कॅम्प नं-३ येथील धर्मदास गौशाळेमुळे उघड झाला. या गौशाळेत एका जखमी गायीच्या दुरावस्था बाबत सामाजिक संघटनेने आवाज उठवून महापालिकेचे लक्ष केंद्रित करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांच्या पथकाने गौशाळेची पाहणी केली. तेंव्हा चौकशीत पोषक आहार गायींना दिले जात नसल्याचे उघड झाले. तसेच एका जखमी गायीची काळजी न घेल्याने, तीच्या अंगात किडे पडले होते. सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी याविरोधात आवाज उठविल्यावर जखमी गायीला उपचारासाठी मुंबईला हलविले. मात्र दुर्दैवाने उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांनी गौशाळेतील दुरावस्थेचा ठपका ठेवून दंड ठोठाविला आहे. तसेच शहरातील गौशाळेची पाहणी करून गायीची दुरावस्था होत असल्यास, कारवाई करण्याचा इशारा उपयुक्तांनी दिला. शहरात विना परवाना असंख्य म्हशींचे तबेले असून तबेल्यातील घाण उघड्या नालीत सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या तबल्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यानिमित्ताने शहरातील तबल्याची नोंदणी अथवा संख्या महापाकिकेकडे नसल्याचे उघड झाले आहे.