उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीं मंगळवारी दिव्यांग संघटने सोबत बैठक घेऊन दरमहा २२०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी १७०० रूपये दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जात होता.
उल्हासनगरातील विविध दिव्यांग संघटनेने दिव्यांगाना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता हा इतर महापालिकेच्या तुलनेत कमी असल्याने, तो वाढून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आयुक्त अजीज शेख यांनी मंगळवारी दिव्यांग संघटने सोबत बैठक घेऊन दिव्यांगाच्या विविध समस्याबाबत चर्चां करण्यात आली. बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, मालमत्ता व्यवस्थापक अलका पवार, उपमुख्यलेखा परीक्षक विलास नागदिवे, लेखा अधिकारी संजय वायदड, दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे विभाग प्रमुख राजेश घनघाव तसेच दिव्यांग संघटनांच्या वतीने डॉ. अशोक भोईर, सचिन सावंत, राजेश साळवे, नरेश गायकवाड, स्वप्निल पाटील, निलेश जाधव आदीजन उपस्थित होते.
महापालिकेत नोंद झालेल्या दिव्यांग बांधवाना ऑगस्ट २०२४ पासून दरमहा २२०० रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याला बैठकीत मान्यता दिली. तसेच दिव्यांगांना महापालिका परिवहन बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत, महापालिका शौचालयांमध्ये रॅम्प सुविधा देणे, पावसाळ्यात दिव्यांग बांधवांना छत्रीचे वाटप करणे, दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी स्टॉलसाठी जागा देण्यासाठी समिती गठीत झाल्यानंतर निर्णय घेणे आदी निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.